पर्यटनाची पंढरी...
                                  माझी राधानगरी....
    

   
       परवाच माझ्या गावाचा  १११ वा वाढदिवस झाला. राजर्षी शाहूंनी वसवलेली राधानगरी. जिची स्थापना ९ फेब्रुवारी १९०८ साली झाली. खरं तर "वळीवडे" या नावानं प्रसिद्ध असणारं आणि अगदी डोंगर कपारीत वसलेलं हे गाव. याला नवीन रूप,  नवीन नाव आणि नवी प्रसिध्दी दिली ती राजर्षी शाहूं महाराज यांनी... श्रीमंत राधाबाई म्हणजेच राजर्षी शाहू महाराज्यांच्या कन्या यांच्या विवाह प्रसंगी वळीवडे चे नामांतरन राधानगरी अस केले... आणि तेथून ही नगरी जग प्रसिद्ध झाली.
         बलदंड सह्यादी च्या खांद्यावर रौध्र रूप धारण करून स्वतःचं अस्तित्व गाजवत वसलेली ही राधानगरी. पश्चिमेला असलेला फोंडा घाट गावाच्या संरक्षणासाठी सतर्क आहे.  भैरीबांभर येथील पाच बोटाच्या पिंपळाच्या झाडाखाली वसलेलं जागृत भैरी देवस्थान, हिच्यावर चौफेर नजर ठेऊन उभा आहे. गावाबाहेररून वाहणारी भोगावती नदी जी  संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करते आणि शाहूंच्या दूरदृष्टीतुन साकारलेला लक्ष्मी तलाव.
           या काळजाच्या कप्प्यात यायचं झाल्यास, याचं प्रवेशद्वार आहे मांजरखिंड... हिरवा आणि नीरव, शांत किर्र असा मांजरखिंडीचा घाट... या घाटाची सुरवात होते ती गैबीच्या तीकटी वरून... येथूनच राधानगरी आपलं अस्तित्व दाखऊ लागते... भर दिवसा झाडाखाली काळाकुट्ट अंधार... किर्रर्रर्र असा आवाज. मनमोहक गारवा. निमसदहरीत सागवानाची बाग, करवंदाच्या जाळ्या, आळुची झाडे, बांबूची बेटे, निलगिरी, बारीक झुडपे आणि घाटाच्या प्रत्येक वळणाला पांढरे शुभ्र झरे, हिरवागार डोंगर कापून बनलेली तांबट वाट...
          साधारणतः कोल्हापूर पासून ५५ ते ६० किमी आणि गैबी मधून २ ते ३ किमीचा हा प्रवास घेऊन येतो गावाच्या वेशीवर. तिथंच आहे दत्ताच डेपोजवळील मंदिर. उगवतीचे मोहक रंग आणि सूर्याची प्रत्येक किरणे उगवताना या दत्त देवाला वंदन करून राधानगरीत प्रवेश करतात... खर तर योगायोगाने जुळून आलेलं, बहुदा निसर्गाने निर्मिलेलं हे त्यांचं नातं. त्यानंतर येत ते पिंपळाच्या झाडा खाली असलेलं राधानगरी बस स्थानक, सतत गजबजलेले, बारा वाड्यांची माणसे घेऊन ओरडणारे. कल्लोळ माजवणारे...हे स्थानक, आणि त्याच्याच शेजारी असणारा राधानगरीतील प्रसिद्ध "गणेश बॉम्बे वडा आणि टी स्टॉल" प्रत्येक प्रवाश्याची भूक आणि तहान भागवण्यास सज्ज असणारी ही छोटीशी टपरी.
       खरं तर येथूनच सुरू होते शाहूंनी निर्मिलेली नवी पेठ... या पेठेच एक देखणं वैशिठ्य आहे. सुरवातीला बस स्टॉप वर असणारे सर्व धर्म पंथाचे लोक... न्हावी... सुतार... चांभार... तेली... पाटील यांची दुकाने...
मग तिथून खाली गेलं की ख्रिचन लोकांची चारच घरे. मग तेथून खाली झाडाच्या गणपती जवळ.. पाटील, सरावने, महाडिक या खानदानी लोकांची घरे...
      आणि उतरणीला असणारे योगेश कॉर्नर वरील जैन मंदिर तेथून सुरू होणारी जैन लोकांची घरे डाव्या बाजुला माळकर, पाटील, चौगले...आणि उजव्या बाजूने जैनांची निल्ले, मुधाळे परिवार मध्येच काही गुरव बंधू... जरा खाली गेलं तर वाणी आणि वैशवाणी यांची घरे... त्या समोरच सोनार आणि मग तायशेटे परिवार...
           आणि सर्वात शेवटी बडदाडे.. काळेबेरे.. आणि मुस्लिम मुल्लानी यांची घरे... त्या खाली हरिजन वसाहत...  पेठेची सुरवात बेघर वसाहत पासून आणि शेवट हरिजन वसाहत पर्यंत... आणि या पासून बाजूलाच आहे तो सतत वर्दळीत असणारा मार्केट चौक. शाहूंनी ही पेठ वसवताना असणारी दूरदृष्टी  आणि विचारसरणी खूप मोहक वाटते.
          खरं तर हा भेद गावात कधीच कुणाला आजवर जाणवून येत नाही, सर्व लोक गुण्या गोविंद्याने, ना कुठल्या धर्माचा, ना कुठल्या जातीचा, तोरा  मिरवत शिरजोर गाजवताना इथं दिसत नाही... जातीच्या नावाखाली, ना इथं कुठल्या दंगली होतात, ना भांडणे... ईद, गणेश चतुर्थी, दिवाळी, पाडवा, रमजान,  संक्रात, नाताळ आणि शिमगा यात खर तर भेदच राहत नाही... हिंदू मुस्लिम ख्रिचन दलित सारे एकच  हा आदर्श आहे या नगरीचा... इथं आंबेडकर जयंती देखील शिवजयंती प्रमाणे साजरी होते.. ज्या उद्देशाने या जयंत्या महापुरुषांनी चालू केल्या तो उद्देश आजही इथं जोपासला जातो.. शाहूं फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला इथं वाव दिला जातो.
        गावाच्या मधोमध असणारे गावंठाण... आणि
गावंठाणातील जोतिबाचे मंदीर... खूप सुंदर असा पार... देवळाच्या बाजूलाच असणाऱ्या बांबूच्या बेटाशेजारील सात आसरा देवी.
          नवरात्रीच्या वेळी साऱ्या नवरातकऱ्यांना घेऊन पालखी प्रथम जाते ती जुनी पेठेत... ओढ्याच्या पलीकडे असणारी जुनी पेठ...आई अंबाबाईचे मंदीर. तिथे दोन्ही देवांची भेट होऊन पालखी नव्या अंबाबाई मंदीरा जवळ येते... बारा बलुतेदार खरं तर यात सामील झालेले आणि एकरूप होऊन गुलालात रंगून सारे जाती भेदाचे रंग विसरून त्या रावणाचे दहन करण्यासाठी एकत्र येतात... यापूर्वी होतो तो सोने लुटण्याचा कार्यक्रम... वाढ वडीलांपासून चालत आलेली ही परंपरा पालखीचं दर्शन घेऊन सोन लुटून... महागाईचा... रोगराईचा... भुरसट विचारांचा रावण पेटविला जातो... आणि असा हा दसरा इथं संपन्न होतो...
       मराठी नव वर्षाच्या सुरवातीला  बैलगाडीला हत्तीच रूप देऊन... हत्तीच सोंग करून... गुलाल उधळीत, इथं "गावचा खेळ" देखील पार पडतो... तमाशा, लोककला, जागर, गाऱ्हाणी आणि भक्ती भावाने... गुलालउधळून एकत्र येऊन... ढोल ताशा  सोबत लेझिम आणि मशाली घेऊन खेळ खेळला जातो मानाचा हत्ती मिरवला जातो... पालखीचा घोडा खेळवला जातो. रात्री १२ च्या सुमारास आरती होते आणि तेथून पुढे जागर आणि तमाशा अश्या लोककला ना देखील हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही राधानगरी... आणि त्याच पहाटे संपूर्ण गावात नव्या तेजाने, नव्या आशेने, नव्या विचाराने गुडी उभारली जाते.
         या परंपरे सोबत इथं आहे ते निसर्गाचा सानिध्य पण.. उत्तुंग कड्यावरून कोसळणारे पाण्याचे प्रपात घेऊन वाहणारा राऊतवाडी धबधबा... रामनवाडी धबधबा... निरभ्र चांदणं आकाश. चमकणारे काजवे आणि डरार्व डरार्व करणारी बेडके... इथं आहे निसर्गाची भ्रमंती, गडकिल्ल्याची भटकंती... धरणाच्या मधोमध असणारा शाहूंचा "बेंझिलव्हीला", हत्ती घोडे बांधण्यासाठी असणारे त्या काळातील हत्ती महाल आजही कणा उंचावत इथं उभा आहे, आत्मिक आनंद मिळऊन देणारे परमेश्वराचे अस्तित्व.. संस्कृतीशी नाळ जोडणारे "गजा नृत्य". बाजूने वाहणारी नितळ भोगावती नदी... त्यावर साकारलेलं  त्या काळातील देशातील सर्वात मोठं धरण लक्ष्मी तलाव, सर्वात जुना पॉवर हाऊस... शेतीसाठी प्रसिद्ध असणारी "शेरी" जीच सौदर्य अनेख चित्रपट आजही खुल्या स्वरूपात दाखवत आहेत. ऊस, भात, मका, भुईमुग ही पिके.. पेरूची, फणसाची चिक्कुची बाग, बांधाला असणारी नारळीची झाडे.  हौसी गवशी आणि नवशी अश्या प्रत्येकाच्या पाऊलाना सतत खुणावते आपल्याकडे आकर्षित करते ही पश्चिम घाटाची किनार राधानगरी...
          राजकारणात रंगणारी, आणि निवडणुकीत  दंगणारी.. १२ वाडीत चर्चेत राहणारी.. आणि पुन्हा नव्याने एकत्र येणारी ही राधानगरी... हुडा... आयरेवाडी... बनाचीवाडी... जूनीपेठ...या वाड्याना स्वतःच्या खुशीत घेणारी अन् आपलंसं करणारी त्यांच्या समवेत नातं निर्मिनारी ही राधानगरी, खूप काही आहे हिच्या कडे तरी कोणत्याही गर्वाने माजून न जाता शांत उभी आहे... आपल्याच विश्वात रमलेली.. प्रत्येकाला खुणावत आहे , आपलं अस्तित्व टिकवून गप्प निरागस बाळा प्रमाणे दटून आहे...
          नुकत्याच युनेस्कोच्या जाहीर झालेल्या जागतिक वारसा यादीत हीच नाव यावं इतकं हे प्रत्येक नगरवासीयांचे श्रीमंत भाग्य.. इथं इतिहासाचा वारसा आहे.. आध्यात्मिक आरसा आहे, उदंड वैभव जपणारा  निसर्ग आहे, आणि त्याच्याच सानिध्यात वसलेलं राधानगरी अभयारण्य हे गवा, भेकर, हरीण, ससे, वाघ, कोल्हे साठी प्रसिद्ध आहे... अनेक जातीची फुलपाखरे आणि छोटी छोटी किटके, अनेक जातींची फुले वनराई इथं आहे जैवविविधता जपणारे ईदरगंज चे पठार आहे. आणि इथल्या प्रत्येक कणात शांतीच लेनं दडलेले आहे... मग असा हा अध्यात्मिक वारसा.. निसर्ग पाहण्यासाठी आपण चालत राहतो आणि अश्या प्रत्येक पाऊलाला खुणावते मग ही वाट.. पर्यटकांच्या सोईसाठी प्रत्येक ठिकाणी हॉटेल तसेच रिसॉर्ट देखील उभारली आहेत. राधानगरी म्हटलं की नारळी भात आणि दुधआंमटी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटवेल असा हा जेवणाचा पदार्थ. इथं यायचं तर निसर्गाशी संवाद साधायला, निसर्गाशी अलगुज मांडायला मग हळू हळू हा निसर्गच आपली सारी गुपिते आपुल्या समोर खुली करतो आणि आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतो अशी ही पर्यटनाची पंढरी माझी राधानगरी...
             
                          
                                  ✍️ अभिजीत तानाजी भाटळे.                                                मु/पो राधानगरी
                                         तालुका राधानगरी
                                         जिल्हा कोल्हापूर
                                         फोन ९७६४३६९०९८

   आवडलं तर नक्की शेअर करा कमेंट करा..... I love my Radhanagari...
       

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2